मुंबई : शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जात भेट घेतली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगोवले, उद्य सामंत आणि शरद पवार यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याने ही भेट नेमकी कशासाठी होती, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी युती केल्याने शिवसेनेत बंड झाले होते. यात 40 आमदार आणि 13 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळेच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो असे म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पवारांवर खापर फोडले होते. मात्र आज अचानक ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
आज दुपारी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरत गोगावले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले. अचानक शिवसेनेचे नेते सिल्व्हर ओकवर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. या भेटी वेळी प्राध्यापक प्रदीप ढवळ हे देखील उपस्थित होते. ही भेट कशा संदर्भात होती या संदर्भात कोणाताही खुलासा करण्यात आला नसल्यामुळे भेटीचे कारण गुलदस्त्यातच असल्याचे समजतेय.