चऱ्होलीतील वाघेश्वर मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी : चऱ्होली येथील पुरातन श्री वाघेश्वर मंदिराचा ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर परिसराच्या सुशोभिकरणासह विविध पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यास चालना मिळणार आहे. तसेच, चऱ्होलीसह सभोवतालच्या भागाच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत श्री वाघेश्वर मंदिराचा समावेश तीथक्षेत्र आणि पर्यटन यादीत करावा, अशी मागणी केली. त्याबाबत कागदोपत्री पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक पुढाकार घेत जिल्हा नियोजन समितीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील सौंदर्यीकरणाच्या दृष्टीकोतून बागबगीच्याची कामे हाती घेता येईल. शासनाच्या विविध विभागामार्फत उपलब्ध होणाऱ्या निधीतून एसटी स्टँड, ग्रामीण रुग्णालय,विजेचा ट्रान्सफॉर्मर किंवा सब स्टेशन तसेच पोलीस चौकी बांधण्यासाठी देवस्थान ट्रस्टतर्फे पाठपुरावा करणे शक्य होणार आहे. देवस्थानला आपल्या हिश्याची रक्कम सेवाभावी संस्थेकडून किंवा दानशूर व्यक्ती कडून देणगी स्वरुपात घेण्यास मुभा राहणार आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान श्री वाघेश्वर महाराज…
श्रावण महिन्यात चऱ्होली व चऱ्होली जवळ असणाऱ्या विविध गावातून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या परिवारासह वाघेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. पुणे जिल्ह्यातील महानस्थळ म्हणून मंदिराला संबोधले जाते. दाभाडे घराण्यातील मूळ पुरुष बज पाटील याचा मुलगा सोमाजी यांचा मुलगा कृष्णाजी दाभाडे याने श्री वाघेश्वर महानस्थळ हे मंदिर बांधले आहे. इ.स.१७२५ मध्ये या मंदिराची उभारणी गावातील टेकडीवर झाली होती. आता मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामीण आणि शहरी भागाचा विकासाचा सेतू निर्माण करीत २०१७ पासून चऱ्होलीतील विविध विकासकामे मार्गी लावण्यात आली. पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यात आल्या. ग्रामदैवत श्री. वाघेश्वर महाराज हे ग्रामस्थांसाठी श्रद्धास्थान आहे. ग्रामस्थांनी जीर्णोद्धारासह वृक्षारोपण आणि सुशोभिकरणासाठी एकोप्याने पुढाकार घेतला. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून मंदिराला तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला, ही बाब निश्चितच अभिमानाची आहे.
– नितीन काळजे, माजी महापौर.
भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावातील विकासाला प्राधान्य देण्याचा संकल्प आम्ही ‘‘भोसरी व्हीजन- २०२०’’ च्या माध्यमातून केला होता. मध्यंतरी कोविड महामारीमुळे किमान दोन वर्षे आणि राज्यातील सत्ता बदलामुळे अडीच वर्षे विकासकामांची गती संथ झाली होती. आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता आहे. त्यामुळे समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवडशी संबंधित विविध प्रलंबित कामे आणि भविष्याचा विचार करुन अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत आहेत.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा.