मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘फायरब्रँड’ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या प्रकट मुलाखतीत ‘मी आजही मुख्यमंत्रिपदाचा दावा करू शकतो’ असे स्पष्टपणे सांगत प्रथमच आपली महत्त्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात मात्र खळबळ माजली आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार’ असे दोन दिवसांपूर्वी ठासून सांगणाऱ्या अजितदादांनी आता “भविष्यात आपण सत्तेसाठी काँग्रेस, उद्धव सेनेप्रमाणेच भाजपसोबतही जाऊ शकतो. पण मुख्यमंत्रिपदाबाबत आता तडजोड करणार नाही,’असे स्पष्ट संकेत दिले आहेत. यावरुन नाना पटोले यांनी अजित पवारांवर प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले म्हणाले, राज्यात नुकतीच खारघरसारखी घटना घडली. अवकाळीचे संकट आहे. अवकाळीमुळे शेतकरी आज आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याने महाराष्ट्राला काळिमा फासली. महागाईमुळे शेतकरी परेशान आहे. बेरोजगारीमुळे युवक परेशान आहेत. या सगळ्या प्रश्नांवर जोर द्यायला हवा तर राज्यात राजकीय स्फोट सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहे.
नाना पटोले म्हणाले, अजित पवारांकडे 145 चा आकडा असेल तर त्यांनी मुख्यमंत्री बनावे. मी मुख्यमंत्री होणार, मुख्यमंत्री होणार असे बोलण्यात काय अर्थ आहे. अजित दादांच्या मनात काय आहे. त्याबद्दल मी काय बोलणार? राजकीय स्फोट होणार होणार असे म्हटले जात आहे. एकदा लोकशाहीचा स्फोट झाला तर काय? दोन दिवसांपूर्वी ते म्हणाले मी राष्ट्रवादीतच राहणार, आता पुन्हा ते जाणार अशी चर्चा सुरू झाली.
अजित पवार आपल्या कालच्या मुलाखतीत म्हणाले की पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात नाईलाजाने काम केले. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, नाईलाज हा शब्द वापरण्यापेक्षा तुम्ही शपथ घ्यायची नव्हती. तुम्ही खुर्चीवर बसून खदखद व्यक्त करण्यापेक्षा पदावर न बसता खदखद व्यक्त करायला हवी होती. अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची आम्हाला अपेक्षा नव्हती. प्रत्येक मुख्यमंत्री या राज्याला काही ना काही देऊन गेला आहे.