मुंबई पोलीस भरतीत बटण कॅमेऱ्याद्वारे फोडला पेपर

पिंपरी-चिंचवड पोलिसांची तपासात होऊ शकते मदत

0

मुंबई : मुंबई पोलिस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. उमेदवारांनी बटण कॅमेऱ्याच्या साहाय्याने प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून ते ई-मेलद्वारे बाहेर पाठवले आणि बाहेर असलेल्या शिक्षकांनी त्यांना उत्तरे मायक्रो ब्ल्यूटूथद्वारे सांगितले. शेकडो जणांनी या प्रकारे परीक्षा दिली.

 

एका उमेदवाराकडून १० लाख रुपये घेण्यात आल्याचा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर कवठेकर यांनी तब्बल १६ प्रकारचे प्रश्नपत्रिकांचे फोटो मुंबई पोलिसांना पुरावा म्हणून दिले आहेत. भांडूप पोलिसांनी कवठेकर यांचा गुरुवारी जबाब नोंदवला आहे. एसआयटीकडून भरती प्रक्रियेतील या गैरप्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी समितीने केली आहे.

 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस भरती वेळी अश्याच प्रकारे पेपर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. त्यावेळी सतर्क पोलिसांनी हा डाव हाणून पाडला होता. यानंतर याचा तपास गुन्हे शाखेचे युनिट चारचे पथक करत होते. गुन्हे शाखेने यामध्ये अनेक आरोपी अटक करुन मोठे रॅकेट बाहेर काढले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांना तपासासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची मदत होऊ शकते.

मुंबई पोलिस दलात रिक्त ७ हजार ७८ जागांसाठी ७ मे रोजी लेखी परीक्षा पार पडली. एकूण २१३ केंद्रांवरून ७८,५२२ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. दरम्यान, भरती प्रक्रियेत हायटेक पद्धतीचा वापर करून गैरप्रकार केला जाणार असल्याची कुणकुण स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला लागली होती. समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी ५ मे रोजीच याबाबत मुंबई पोलिसांना माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत काही जण अशा प्रकारे कॉपी करताना आढळून आले होते. यात कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे, गोरेगाव पोलिस ठाणे, मेघवाडी पोलिस ठाणे आणि भांडूप पेालिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवले.

दरम्यान, बुधवारी मुंबई पोलिस दलातील भरतीसाठीची अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. मात्र, समितीने मुंबईतील डीसीपी पुरुषोत्तम कराड यांचीही भेट घेऊन या प्रकरणी माहिती दिली आहे. अशा प्रकारे परीक्षा पास करून देणारे मोठे रॅकेट सक्रिय असून एका उमेदवाराकडून यासाठी १० लाख रुपये घेण्यात येत होते, असा दावाही समन्वय समितीचे राहुल कवठेकर यांनी केला आहे. या गैरप्रकाराची व्याप्ती मोठी असल्याने आम्ही एसआयटी चौकशीची मागणी केल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.