मुंबई : मुंबई पोलिसांना येणारे धमकीचे फोन काही केला थांबायला तयार नाहीत. आता अजून एक असाच कॉल आला. संबंधित व्यक्तीने आपल्या बोलण्यात 26/11चा उल्लेख करत फोन अचानक कट केला. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संबंध देश हादरून गेला होता. त्याच्या दुःखद आठवणी अजूनही ताज्या आहेत. नेमका त्याचा हल्ल्याचा उल्लेख करून फोन आल्याने पोलिस अधिक दक्ष झालेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलिसांना धमकीचे फोन सुरू आहेत. त्यातच रविवारी रात्री एका अनोखळी क्रमांकावरून फोन आला. त्यात संबंधिताने मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा उल्लेख केला आणि अचानक फोन कट केला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण राजस्थानमधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच मुंबई हल्ल्याशी संबंधित माहिती आपल्याला दिली जात असल्याचे पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे या व्यक्तीने यापूर्वीही फोन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस अधिक दक्ष झालेत.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकीही काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने दिली होती. या व्यक्तीला पोलिसांनी चेंबूर परिसरातून अटक केली होती. इरफान अहमद शेख (वय 27) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी असल्याचे सांगितले होते.
मुंबई पोलिसांना फेब्रुवारी महिन्यातही एक फोन आला होता. त्यात 26/11 सारखा हल्ला करू, असा इशारा देण्यात आला होता. तसेच मुंबईतल्या कुर्ला भागात स्फोट करू, असा इशाराही एका व्यक्तीने फोन करून दिला होता. त्यानंतर पोलिसांनी कुर्ला येथे जात चौकशी केली. मात्र, त्यांना तेथे काहीही सापडले नाही.
मुंबई विमानतळ, मंत्रालय, बीएसई या महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त नेहमीच कडेकोट असतो. मात्र दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर धार्मिक स्थळांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षाही कडक करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वीही मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.