मुंबई : लोकसभा निवडणुकीत ४८ जागांचे वाटप कसे करायचे, यावरून महाविकास आघाडीत वादविवाद सुरू झाले होते. ‘मोठ भाऊ, छोटा भाऊ’ या मुद्द्यावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे झाले. मात्र आता हा विषय फार न ताणता तडजोडीतून जागावाटपावर एकमत व्हावे या उद्देशाने राष्ट्रवादीने मध्यममार्ग काढला आहे. २०१९ मध्ये राज्यात भाजपने जिंकलेल्या २३ व छत्रपती संभाजीनगर (एमआयएम) अन् अमरावती (अपक्ष) या दोन अशा २५ खासदारांविरोधात कुठे कुणाचा उमेदवार द्यायचा यावर आधी चर्चा करावी, आपल्या २३ जागांचा निर्णय दुसऱ्या टप्प्यात घेऊ, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला.
उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सोमवारी तडजोडीची भूमिका जाहीर केली होती. काँग्रेस नेत्यांना मात्र उद्धवसेना व राष्ट्रवादीकडून तिसऱ्या क्रमांकाची दिली जाणारी वागणूक मान्य नाही. पक्षाच्या कार्यकारिणीची मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘भाजपला पराभूत करण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्रच आहोत. जागावाटपाचा कोणत्याही फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाही. तिन्ही पक्षांच्या नेत्यांची समिती जागावाटपाचा निर्णय मेरिटच्या आधारावरच घेेईल.’ दरम्यान, तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांची समन्वय समिती नेमण्याचे याआधी ठरले होते. पण अद्याप एकाही पक्षाने त्यासाठी नाव जाहीर केलेले नाही.
सोलापूर, माढा, अकोला जागांवरून मविआत रस्सीखेच आहे. २०१९ मध्ये अकोल्यात भाजप विजयी झाला. वंचित बहुजन आघाडीचेे प्रकाश आंबेडकर तिथे दुसऱ्या स्थानी होते. ही जागा मविआने आपल्याला द्यावी अशी त्यांची आता अपेक्षा आहे. पण काँग्रेस व राष्ट्रवादीला ते मान्य नाही. ही जागा आघाडी उद्धवसेनेला सोडेल. त्यांनी आपल्या कोट्यातून ती आंबेडकरांना द्यावी, असा पर्याय यातून काढला जात आहे. गेल्या विधानसभेला वंचितमुळे दोन्ही काँग्रेसचा ४० जागांवर पराभव झाला होता. हा धोका या वेळी टाळण्यासाठी वंचित आघाडीला योग्य स्थान देण्याची मागणी होत आहे.