कोल्हापूर, नगरमधील घटना महाराष्ट्राला न शोभणाऱ्या : शरद पवार

0

मुंबई : कोल्हापूर, अहमदनगरमध्ये धार्मिक तणावाच्या ज्या घटना घडल्या, त्या महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणाऱ्या नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तसेच, अशा स्थितीत शासकीय यंत्रणेला सर्वसामान्यांनी मनापासून सहकार्य करावे. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निवळेल व शांतता प्रस्थापित होईल, असे आवाहनही शरद पवारांनी केले. ते बारामतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, राज्यात ज्या-ज्या ठिकाणी तणावपूर्ण घटना घडल्या तेथील जनतेला माझे कळकळीचे आवाहन आहे की, शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणेला मनापासून सहकार्य करावे. महाराष्ट्र हे संयमी व शांतताप्रिय राज्य आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांची कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती नाही. सर्वांनी सहकार्य केले तर आता जी काही तणावपूर्ण स्थिती आहे ती लगेच निवळेल.

शरद पवार म्हणाले, राज्यात कुणी तरी जाणीवपूर्वक वाद वाढवण्याचा प्रयत्त करत असेल तर त्यांनाही माझी विंनती आहे की, अशा घटनांमध्ये सर्वसामान्यांना किंमत मोजावी लागते. अशा घटना सर्वसामान्यांच्या हिताच्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांची काळजी म्हणून तरी अशा घटनांना प्रोत्साहन देऊ नये.

शरद पवार म्हणाले, कोल्हापूर शहराला सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अशी पार्श्वभूमी असलेल्या शहरात तणाव निर्माण होणे चुकीचे आहे. कुणी चुकीचे वागत असेल तर बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घ्यावी. त्यामुळे वातावरण बदलेल.

सध्या दुधाच्या दरात मोठी घसरण झाल्याने दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत. त्यावर शरद पवार म्हणाले, यापूर्वी असा प्रकार झाला होता तेव्हा आम्ही दूध उत्पादकांना लिटरमागे 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. शेतीला जोडधंदा म्हणून आज अनेक शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात. काही जणांचे कुटुंब तर दुधाच्या व्यवसायावरच चालते. असे कुटुंब आता अडचणीत आले आहेत. यासंदर्भात येत्या 10-15 दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटून दूध उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी करणार असल्याचे शरद पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.