मुंबई : शिंदे सरकारच्या नव्या जाहिरातीवरुन विरोधी पक्ष शिंदे गटावर टीका करत आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या 9 पैकी 5 वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न सीएम शिंदे करत आहेत का?, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
दरम्यान अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, जाहिरातीमधे शिवसेनेच्या 9 मंत्र्यांची माळ लावली असे म्हणत टीका केली आहे. तर भाजपच्या मंत्र्यांचे फोटो का टाकले नाहीत, असा सवाल ही उपस्थित केला आहे. शिवसेनेच्या 9 मंत्र्यांपैकी 5 मंत्री हे वादग्रस्त आहे, या मंत्र्यांच्या विरोधात माध्यमातून सातत्याने बातम्या सुरू आहेत. मग अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न शिंदे करत आहेत का?, असा संतप्त सवाल अजित पवारांनी विचारला आहे.
गेली काही दिवस कल्याण लोकसभामतदारसंघात भाजप आणि शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद पाहायला मिळत आहेत. यावरुन भाजप सांगेल तोच उमेदवार अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तर भाजपने ताकदीचा उमेदवार दिल्यास खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दाखवून भाजपलाच आव्हान दिले होते. यावर अजित पवार म्हणाले की, मानपाडा पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, याबाबतचे पत्र आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे.
कालच्या जाहिरातीत फडणवीसांना डावलले होते. तर नव्या जाहिरातीत फडणवीसांना मानाचे पान दिले आहे. त्यामुळे फडणवीसांची कोंडी कोण करतंय, असे तुम्हाला वाटते? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, हे पाहा, जे स्वत:च्या कर्तृत्वाने पुढे जातात, त्यांची कुणीही कोंडी करू शकत नाही. मराठी भाषेत एक म्हण आहे, कोंबडा कितीही झाकला तरी तो आरवायचा राहत नाही. पहाट झाली की कोंबडा आरवतोच. इथे कोंबड्याची उपमा मी कुणालाही दिली नाही, असेही यावेळी स्पष्ट केले.