मुंबई : आज विरोधकांची पाटणा येथे जी बैठक होत आहे, ती मोदी हटाव बैठक नाही, तर कुटुंब बचाव बैठक आहे. मेहबुबा मुफ्तींसोबत युती केल्याने भाजपवर सातत्याने टीका करणारे उद्धव ठाकरे आज बैठकीत त्याच मेहबुबा मुफ्तींच्या बाजूला बसले आहेत. आपले कुटुंब वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे कोणतीही तडजोड करण्यास तयार आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आज पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपला परिवार कसा वाचू शकेल, आपल्याच कुटुंबाकडे कशी सत्ता राहू शकेल, यासाठीच आज पाटण्यात विरोधक एकत्र आले आहेत. पाटण्याला जी बैठक आहे ती मोदी हटाव बैठक नाही, तर परिवार बचाव बैटक आहे. यांच्यासाठी राजकारण करणे हा धंदा आहे. तर, भाजपसाठी, मोदीसाठी राजकारण म्हणजे सेवा आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोदींना विरोध करण्यासाठी 2019लाही विरोधक एकत्र आले होते. तेव्हा त्याचा काहीच परिणाम झाला नाही. 2019ला जनतेने मोदींच्या पारड्यात बहुमत टाकले. तीच गत विरोधकांची आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत होईल. जनतेला विरोधकांचे हे ढोंग माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाटण्यातील विरोधकांच्या आजच्या बैठकीतील आश्चर्य म्हणजे उद्धव ठाकरे हे मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजुलाच जावून बसले आहेत. याच मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपने युती केली म्हणून उद्धव ठाकरे सातत्याने टीका करत होते. आज त्यांच्या बाजुलाच ते जाऊन बसले आहेत. यावरूनच आता उद्धव ठाकरे सत्तेसाठी, परिवार वाचवण्यासाठी कोणतीही तडजोड करण्यात तयार आहे, हे दिसून येते.