लाखो भाविकांच्या गर्दीने दुमदुमली पंढरीनगरी

0

पंढरपूर : पावलो पंढरी वैकुंठ भुवन।
धन्य अजि दिन सोनियाचा।।
ज्या विठुरायाच्या ओढीने संतांच्या नामाचा गजर करत शेकडो मैलांची वाटचाल केली, त्या मायबाप विठ्ठलाच्या पंढरी नगरीत अखेर आज (दि. २८) लाखो वारकरी सर्व संतांच्या पालख्यांसोबत दाखल झाले. पालख्यांसोबतचे सुमारे नऊ आणि महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरून स्वतंत्रपणे दाखल झालेले सुमारे दोन लाख, अशा सुमारे ११ लाख वारकऱ्यांमुळे पंढरपूर गजबजून गेले आहे.

पंढरपूरजवळच्या वाखरी मुक्कामाहून दुपारी एक वाजता संतांच्या मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्या. वाखरी ते पंढरपूर हा भक्तीमार्ग टाळ, मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेला होता. पंढरपूर हाकेच्या अंतरावर राहिल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला होता.

श्री संत सोपानकाकांचा पालखी सोहळा दुपारी एक वाजता, संत तुकाराम महाराजांचा दीड वाजता, तर संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा दोन वाजता पंढरीकडे मार्गस्थ झाला. विसावा पादुका मंदिराजवळ संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ आणि संत मुक्ताबाई यांचे पालखी सोहळे येऊन दाखल झाले होते. या संतांना माहेरी पंढरीला घेऊन जाण्यासाठी श्री पांडुरंगाचा निरोप घेऊन संत नामदेवराय येऊन पोहोचले होते.


सायंकाळी चार वाजता एकनाथ महाराज यांचे इसबावी येथे उभे रिंगण पार पडले. तर, सायंकाळी सहा वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण मोठा उत्साह आणि भक्तीमय वातावरणात पार पडले. सर्वात शेवटी दुपारी दोन वाजता वाखरीहून निघालेला श्री संत ज्ञानराजांचा पालखी सोहळा वाखरीचा ओढा पार करून पुरंदरे मळ्याजवळ पोहोचला.

येथे माऊलींची पालखी मुख्य रथातून उतरवून भाटे यांच्या रथात ठेवण्यात आली. हा रथ ओढण्याचा मान परंपरेप्रमाणे वडार समाजाला आहे. या समाजातील बांधवांनी हा रथ ओढत इसबावी येथील पादुका मंदिरापर्यंत आणला. सायंकाळी साडेसहा वाजता हा सोहळा इसबावी येथे पोहोचला. यावेळी हजारो भाविकांनी खारीक, बुक्क्याची मुक्तपणे उधळण करीत माऊलींचे दर्शन घेतले.

पंढरी समीप आल्याने दिंड्यांमध्ये टाळ-मृदंगाच्या साथीने भजनात रंग भरला जात होता, तर अनेक दिंड्यांमध्ये विविध खेळ खेळले जात होते. इसबावी येथे पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने सर्व संतांच्या पालखी सोहळ्यांचे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण ‘माऊली माऊली’ नामाच्या जयघोषात पार पडले.हे रिंगण पाहण्यासाठी लाखो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. आरतीनंतर श्री ज्ञानराजांच्या पादुका श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात घालण्यात आल्या. उजव्या हाताला वासकर, तर डाव्या हाताला सोहळ्याचे मालक आरफळकर यांना घेवून शितोळे सरकार श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीकडे मार्गस्थ झाले.

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानराज, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई, श्री संत एकनाथ महाराज यांच्यासह असंख्य संतांच्या पालख्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, एस. टी. बसस्थानक, अर्बन बँक, नाथ चौकमार्गे रात्री पंढरीत मुक्कामी पोहोचल्या. या सर्व पालखी सोहळ्यांसोबत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेला विठ्ठल भक्तीचा प्रवाह चंद्रभागेत विलीन झाला. त्यामुळे चंद्रभागेस विठ्ठल भक्तीचा महापूर आल्याचेच चित्र दिसत होते. आषाढी पर्वकाळात पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्णिीची शासकीय महापूजा होत आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत चांगा वटेश्‍वर, संत चौरंगीनाथ, माता रुक्मिणी, गुलाबबाबा, संत नाथ महाराज, संत गवार शेठ वाणी, संत गोरोबा काका, संताजी जगनाडे महाराज, संत मच्छिंद्रनाथ, संत कानिफनाथ आदि संतांसमवेत आलेले सुमारे नऊ लाख तर, एसटी, रेल्वे आदी सार्वजनिक वाहतुकीतून आलेले जवळपास दोन लाख असे सुमारे ११ लाख वैष्णव यंदा आषाढी वारीसाठी पंढरीत दाखल झाले आहेत.

कीर्तन, भजन, हरिनामाच्या जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या गजराने विठुरायाची पंढरी दुमदुमून गेली आहे. यंदा उन्हाचा तडाखा आणि लांबलेला पाऊस यामुळे भाविकांची संख्या कमी दिसून येत आहे. भाविकांना रांगेतून दर्शन घेण्यासाठी साधारणपणे १४ ते १५ तास लागत आहेत. पंढरपुरातील मठ, धर्मशाळा, लॉज, मोकळे पटांगण जिथे जागा मिळेल तिथे भाविकांनी जागा पटकावल्या आहेत.

मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून शेड उभे केले आहेत. या शिवाय रांगेतील भाविकांना आरोग्य, पिण्याचे पाणी, नाश्ता दिला जात आहे. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तसेच गर्दीच्या ठिकाणी ‘माऊली पथक’ तैनात केले आहे.

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. शासकीय विश्रामगृह येथे ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी सोलापूर वनविभागाने तयार केलेल्या कॉफी टेबल बुकचे त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

उद्या पहाटे (दि. २९) मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. सकाळी ११ वाजता तीन रस्ता येथे आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या अन्नदान कार्यक्रमात ते उपस्थिती लावणार आहेत. तसेच दुपारी साडेअकरा वाजता तीन रस्ता येथे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरात जाऊन वारकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री कृषी उत्पन्न बाजार समितीतील कृषी प्रदर्शनाला भेट देणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.