राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. यासंदर्भात अज्ञात आरोपींविरूद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हडपसर परिसरात आमदार रोहित पवार यांचं सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करत जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला.

आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये असलेली एक सायकल आणि कार्यालयाची काही प्रमाणात जाळपोळ देखील झाली. सायकलला ऑइल पेंटच्या साह्याने आग लावण्यात आली आहे. शेजारीच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात तीन व्यक्ती येताना दिसत आहेत. या व्यक्ती कोण आहेत? त्यांनी आग का लावली असावी, या प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून शोधली जात आहे. दरम्यान, हडपसर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करित आहेत.

राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार यांचे नातू तथा कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे अतिशय आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते बंडखोर आमदारांविरूद्ध सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ले चढवत आहेत. त्यामुळे रोहित पवार सद्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत. दरम्यान, रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच पुरोगामित्वावरील हल्ले खपवून घेणार नाही, असा सत्ताधाऱ्यांना इशारा दिला होता. त्यामुळे त्यांच्या कार्यालयावर झालेला हा प्रकार देखील तितकाच गांभीर्याचा विषय बनला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.