पिंपळे सौदागरमध्ये १५ फूट रस्ता खचला
बांधकाम व्यवसायिक आणि महापालिका अधिकाऱ्यांचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
पिंपरी : सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न करता तसेच निकृष्ट दर्जाचे पायलिंग केल्याने पिंपळे सौदागर येथील महापालिकेचा १५फूट रस्ता खचला. शाळांच्या परिसरामध्ये तसेच ऐन रहदारीचा मोठा रस्ता अचानक खचल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने, या रस्त्याच्या कडेला कोणतीही स्कूल व्हॅन उभी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, महापालिका अधिकारी आणि स्थानिकपुढाऱ्यांनी घटनस्थळी धाव घेत यात महापालिकेचीच कशी चूक आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवित बांधकाम व्यावसायिकालावाचविण्याचा प्रयत्न केला.
पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावर एका बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीचे काम सुरू झाले आहे. इमारतीसाठीखोल खड्डा खनन्यात आले. त्याच्या चारही बाजूंनी पायलींग करण्यात आले आहे. मात्र, हे पायलिंग अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यातआल्याचे, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिकाने इमारतीसाठी आपल्याच जागेत खड्डा घेतला असला तरीहा खड्डा रस्त्याच्या सीमेला लागून घेतला आहे. इमारतीच्या दोन तळ मजल्यासाठीचा हा खड्डा असल्याने प्रचंड खोल आहे.
बांधकाम व्यावसायिकाने हे काम करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी घेतली नाही. तसेच पायलिंगाचे कामही निकृष्ठदर्जाचे केल्याने आज (गुरुवार) सकाळी सव्वासातच्या सुमारास हा रस्ता खचून इमारतीच्या खड्ड्यात वाहून गेला. परिसरातील नागरिकआपल्या मुलांना शाळेत सोडविण्यासाठी निघालेले असताना तसेच अनेक नागरिक मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेले असताना ऐनरहदारीचा तब्बल १५ फूट रस्ता वाहून गेल्याने सर्वत्र खळबल उडाली.
रस्ता खचून वाहून गेल्याची घटना घडल्यानंतर काही वेळातच महापलिकचे काही कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी रस्त्यावर एकाबाजूने बरिकेट्स लावले. दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू ठेवली. त्यानंतर तातडीने बांधकाम व्यावसायिक तसेच त्यांचे कर्मचारी घटनास्थळीहजर झाले. स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. महापालिकेचा काही आदेश यायच्या आतच बांधकामव्यावसायिकाने वाहून गेलेल्या रस्त्याच्या जागी भराव टाकण्याचे काम सुरू केले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तेथील वाहतूक कोंडीसोडविली.
मोठी जीवितहानी टळली….
पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावर कुंजीर निवास समोर ही दुर्घटना घडली. या परिसरात चार मोठ्या शाळा आहेत. याशाळांकडे जाणारा हा रस्ता आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच या रस्त्यावरून स्कूल बस, व्हॅन विद्यार्थ्यांना घेऊन ये जा करतअसतात. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाजूने पत्र्याचे कंपाऊंड मारले आहे. त्यामुळे येथे या बस थांबतात. आज नुकतीच तेथूनस्कूल बस पुढे गेली आणि पुढच्या काही वेळाने रस्ता खचला. त्यामुळे स्कूल बस अजून काही मिनिटे या ठिकाणी थांबली असती तरखूप मोठी दुर्घटना घडली असती. ज्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
नागरिकांचा जीव धोक्यात घालून काम…
रस्ता खचल्यानंतर तो तातडीने तयार करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने जोरात तयारी केली. तातडीने जेसीबी, क्रेन, डंपरच्यासाहाय्याने खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी भराव टाकण्याचे काम सुरू केले. एका बाजूने वाहतूक सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला हे कामसुरू होते. काम सुरू करताना वाहतूक नियोजनासाठी एकही पोलिस किंवा महापालिकेचा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हता.
अधिकाऱ्यांकडून महापालिकेची बदनामी…
रस्ता खचल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे महापालिकेचे काही अधिकारी आणि स्थानिक राजकीय पुढारीउपस्थित होते. महापालिकेची पाण्याची पाइपलाइन लिकेज असल्याने आणि तेथे काळी माती असल्याने रस्ता खचला. महापालिकेनेलीकेज काढले नव्हते, असे या ठिकाणी नागरिकांना सांगण्यात आले. हे सांगण्यात काही महापालिका कर्मचारी, अधिकारी आघाडीवरहोते.
भरपाई घेऊ, कारवाई कशाला….
बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीमुळे ही घटना घडली आहे. त्यामुळे त्याच्याकडून रस्ता तयार करून घेण्यात येईल. कारवाईची गरजनाही. गुन्हा दाखल करायची काय गरज, त्याने काय होईल, अशी असंवेदनशील प्रतिक्रिया महापालिकेचे शहर अभियंते मकरंद निकमयांनी दिली.
बांधकाम व्यावसायिक संजय रामचंदानी आणि घनश्याम सुखवानी यांच्या मालकीची ही इमारत आहे. संपूर्ण रस्ता होईपर्यंत इमारतीचेकाम बंद ठेवण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिकाने झालेल्या सर्व कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर त्याला काम सुरूकरण्यास परवानगी दिली जाईल.
– मकरंद निकम, शहर अभियंते, महापालिका
सकाळी सव्वासातच्या सुमारास रस्ता खचल्याची घटना घडली. मी सोसायटीच्या बाहेर उभा होतो. माझ्या समोरच रस्ता खचून खालीइमारतीच्या खड्ड्यात वाहून गेला. रस्ता खचायच्या काही मिनिटे आधी तेथून स्कूल बस गेली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
– बाळासाहेब कुंजीर, प्रत्यक्षदर्शी