भारतीय उद्योगांना जगभर विस्ताराची संधी – डॉ. नौशाद फोर्ब्स

राजर्षी शाहू स्वायत्त कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

0

पिंपरी : भारतीय उद्योगांना जगभर विस्ताराची मोठी संधी आहे. मात्र, त्यासाठी संशोधन आणि विकास यावर उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था, कंपन्यांनी अधिक भर दिला पाहिजे. जागतिक पातळीवर भारताचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन फोर्ब्स मार्शल कंपनीचे सह अध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्स यांनी केले.
    आरोग्य मंत्री आणि जेएसपीएम संस्थेचे संस्थापक सचिव तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ताथवडे येथील जेएसपीएम संस्थेच्या राजर्षी शाहू स्वायत्त कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (आरएससीओई) महाविद्यालयातील पहिल्या स्वायत्त बॅचच्या गुणवंत आणि विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ बुधवारी (दि. २ ऑगस्ट) आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे
आयोजित केला होता. यावेळी डॉ. नौशाद फोर्ब्स बोलत होते. यावेळी जेएसपीएम संस्थेचे सचिव
गिरीराज सावंत, ताथवडे संकुलातील संचालक रवी सावंत तसेच सुधीर भिलारे, डॉ. रवी जोशी संचालक जेएसपीएम, अनिल भोसले संचालक जेएसपीएम, डॉ. महेश काकडे परीक्षा विभाग संचालक पुणे विद्यापीठ, दत्ता कुवळेकर मुख्य कार्यकारी अधिकारी फोर्ब्स मार्शल, डॉ. आर. के. जैन संचालक, आरएससीओई., उपप्राचार्य अविनाश देवस्थळी, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. संतोष बोर्डे, डॉ.अविनाश बडदे, डॉ. बी. डी‌. जाधव आदी उपस्थित होते. यावेळी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
डॉ. रवी जोशी म्हणाले, यशाची व्याप्ती खूप मोठी आहे. सर्वांच्या सांघिक प्रयत्नांवर यश अवलंबून असते. सर्वांच्या सहकार्यामुळेच जेएसपीएम शिक्षण समूहाच्या राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये अल्पावधीतच आघाडी घेऊन दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. संस्था विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करते. आज जे विद्यार्थी अभियांत्रिकी पदवी घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील एक टप्पा पूर्ण केला असून पुढील वाटचाल यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत आणि कष्ट करावेत, अशी अपेक्षा डॉ. जोशी यांनी व्यक्त केली.
  दत्ता कुवळेकर म्हणाले, केवळ पैसे कमाविण्यासाठी शिक्षण घेऊ नका; तर आपल्या शिक्षणातून पुढे कामाचा आनंद मिळेल समाधान मिळेल असे कार्य करा. आयुष्यामध्ये गरजा भागविण्यासाठी पैसा जरूर लागतो. परंतु त्याचबरोबर मानसिक समाधान मिळणे ही तितकेच आवश्यक आहे, असे कुवळेकर यांनी सांगितले.
पुणे विद्यापिठाचे परिक्षा नियंत्रक डॅा. महेश काकडे म्हणाले की, विद्यार्थ्यानी नुसते ज्ञानार्जन न करता त्या ज्ञानाचा वापर करून स्वताःचा बुद्धयांक वाढवला पाहीजे म्हणजे आपण जगात ताठ मानेने वावरू शकू .
प्रारंभी डॉ. आर. के. जैन यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल जोशी यांनी केले. आभार डॉ. बी. डी‌. जाधव यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी पालक शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‌‌

Leave A Reply

Your email address will not be published.