पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

0

पिंपरी : पुण्यातील मगरपट्टा येथे मद्यपी तरुणाने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर, पिंपरी-चिंचवडमध्येही गुन्हे शाखेच्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथे घडली.

प्रमोद प्रकाश साखरे (२६, भोंडवे बाग, रावेत), वैभव भाऊसाहेब तुपे (२८, रा. ओटास्कीम, निगडी), अजय बाबासाहेब पोळ (२१, गुरुदत्त कॉलनी, निगडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण कांबळे (नेमणूक: गुन्हे शाखा) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण कांबळे सहकार्यासोबत निगडी परिसरात गस्त घालत असताना, आरोपी आपसात भांडण करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना हटकले असता, आरोपींनी आपसात संगनमत करून पोलिसांवर हल्ला चढवला. त्यांनी हवालदार कांबळे यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, “पोलिसांना खूप माज आला आहे,” असे म्हणत एका पोलिसाचे बोट पिरगळले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, आणि शत्रुघ्न माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले असता, त्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आरोपी प्रमोद साखरे आणि वैभव तुपे यांनी भिंतीवर डोके आपटून कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. शिवाय, “तुमच्या सगळ्यांना बघून घेतो, तुमच्या सगळ्यांना कामाला लावतो,” अशी धमकी दिली. निगडी पोलिस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.