उत्तरप्रदेशात फिल्मसिटी नेण्याच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री योगी येणार मुंबईत

0

मुंबई : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशात फिल्मसिटी उभारण्यासाठी नोएडा जवळील यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी १००० एकर जागाही राखून ठेवली आहे. ही फिल्मसिटी बॉलिवूडपेक्षाही मोठी असेल असे म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर योगी हे उद्या बुधवारी मुंबईला येणार आहेत.

१ डिसेंबरच्या रात्री योगी आदित्यनाथ लखनऊहून मुंबईसाठी रवाना होतील. २ डिसेंबरला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा कार्यक्रम संपल्यानंतर योगी आदित्यनाथ उद्योजक आणि बॉलिवूड सेलिब्रेटींना उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतील. या बैठकीत दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, टी सीरिजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, नीरज पाठक, रणदीप हुडा, तिगमांशू धुलिया, जिमी शेरगिल, तरण आदर्श, कोमल नाहता आणि राजकुमार संतोषी उपस्थित राहतील अशी माहिती अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलला दिली आहे.

सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते. अनेक सेलिब्रेटींनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. योगी आदित्यनाथ यांनी यासंबंधी लखनऊतही बैठक घेतली होती.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. “बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत एन चंद्रशेखर, बाबा कल्याणी, हिरानंदानी यांचा समावेश आहेत. ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.