आरोपीकडे सापडले गॅझेटेड अधिका-यांचे १०० पेक्षा जास्त बनावट शिक्के!
९ दिवसांची पोलिस कोठडी. भाई हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळा प्रकरण
सुनिल झंवर याच्या घरात तर पोलिसांना तहसिलदार, जिल्हाधिकारी तसेच अनके वरिष्ठ अधिका-यांचे सुमारे १०० बनावट सरकारी शिक्के सापडले आहेत. त्याचप्रमाणे अधिकृत २ संकेतस्थळं असताना वेगळे बनावट संक़ेतस्थळ आरोपींनी तयार केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यावरून हे प्रकरण केवळ बँक घोटाळ्याशीच फक्त संबधित नाही तर इतरही अनेक गुन्हे त्यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि नीट चौकशी झाली तर फार मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच पोलिसांवर दबाव आणला जात असावा अशी शंका घ्यायला जागा आहे.
सुजीत बाविस्कर, धरम किशोर सांकला, महाविर मानकचंद जैन, विवेक देविदास ठाकरे यांना अटक करण्यात आली असून पोलिस माहेश्वरी, अवसायक जितेंद्र कंदारे,प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनिल झंवर, योगेश साकला आणि इतर काही आरोपींचा शोध घेत आहेत. सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरिक्षक सुचेता खोकले या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
हा घोटाळा काही हजार कोटींचा असल्याचं बोललं जात आहे. सहकार विभागाने केलेल्या चौकशीत एकट्या पुणे शाखेतच १६०० कोटींचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले होते. राजकारणी आणि अधिकारी यांचे काळा पैसा दडवण्याचे केंद्र,कोट्यावधी रुपयांचे बेनामी व्यवहार, अनेक कायदे आणि नियम यांचे सर्रास उल्लंघन असे अनेक गैरप्रकार केल्याचे आरोप या पतसंस्थेवर आहेत . भाई हिराचंद रायसोनी ही मल्टीस्टेट पतसंस्था असल्याने आणि मल्टीस्टेट क्रेडीट को – ऑपरेटिव्ह सोसायटीज् कायदा २००२ प्रमाणे अशा संस्थावर कारवाईचे अधिकार केंद्र सरकारला असल्याने महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त या पतसंस्थेवर कारवाई मात्र करू शकत नव्हते त्यामुळं सहकार आयुक्तांनी हा चौकशी अहवाल केंद्र सरकारला पाठवला होता.
जळगाव मुख्यालय असलेल्या या पतसंस्थेच्या महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये २६४ शारवा आहेत.. बीएचआर अडचणीत आल्यावर संस्थापक प्रमोद रायसोनींसह संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या पतसंस्थेचे प्रमोद रायसोनीसह सर्व १३ संचालक आजही कारागृहात आहेत. बेनामी ठेवी व आर्थिक गैरव्यवहारामुळे अडचणीत सापडलेल्या या पतसंस्थेला नंतर दिवाळखोरीत काढण्यात आले. त्यानंतर केंद्रीय सहकार आयुक्तांनी अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती केली होती. कंदारे आणि इतर यांनी सुमारे ११०० ते १२०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
पतसंस्थेवर एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर.संस्थेच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या . मात्र त्यांची विक्री करताना त्यातही घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले. पतसंस्थेवर नेमलेल्या अवसायकाने जप्त केलेल्या मालमता कवडीमोल भावाने विकल्या. अर्थात अवसायकाला राजकारण्यांना आणि विविध अधिका-यांना अंधारात ठेउन ते करता येणे शक्यच नव्हते. त्यामूळे त्याने किंवा काही अधिकारी आणि राजकारण्यांनी त्याला हाताशी धरून करोडो रुपयांच्या मालमत्ता कवडीमोल भावाने ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. ही बँकेच्या भागधारकांची आणि ठेविदारांची फसवणूक आहे. त्यामुळेच या धाडसत्रा नंतर अनेक राजकारण्यांचे आणि अधिका-यांचे धाबे दणाणले असावे.आता हे प्रकरण तडीस जाते की राजकीय साठमारीचा बळी ठरते हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.