पिस्तुलाच्या धाकाने लूटमार करणारे अटकेत

0
पुणे : चाकण-म्हाळुंगे येथे मध्यरात्री जाणार्‍या येणार्‍या लोकांना अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना पेट्रोलिंग करणार्‍या पोलिसांनी रंगेहाथ पकडले. राम बबन लालगुडे (३२, रा. भांगरे वस्ती, म्हाळुंगे ता. खेड), लखविंदर कर्नलसिंग बाजवा (४३, रा. भांगरे वस्ती, म्हाळुंगे, मूळ ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) आणि विश्वनाथ दामोदर शिंदे (२९, रा. द्वारका सिटी, म्हाळुंगे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राम लालगुडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरुद्ध गेल्या वर्षी आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २५ हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि कार अशा १ लाख ८६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस काॅन्स्टेबल नीतेश हणमंत राठोड (२९) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नीतेश राठोड व होमगार्ड देवधरे हे चाकण पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहेत. ते दोघे बुधवारी रात्री पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी म्हाळुंगे येथील द्वारका स्कूलजवळ ५ जण येणार्‍या जाणार्‍यांना अडवून त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. हे पाहिल्यावर त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली. त्याबरोबर चव्हाण व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहाेचले. त्यांनी तिघांना ताब्यात घेतले. या गडबडीत दोघे जण पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.