बालाजीनगरमध्ये पोलिसांवर दगडफेक

तडीपार आरोपीवर कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर घडली घटना

0

पिंपरी : तडीपार केलेला आरोपी पोलिसांची परवानगी न घेता शहरात आल्यामुळे त्याला पकडून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने दगडफेक केली. तसेच पोलीस विनाकारण त्रास देत असल्याची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. याबाबत तडीपार आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. २) रात्री साडेनऊ वाजता बालाजीनगर झोपडपट्टी येथील संत निरांकरी मठाच्या बाजूला घडली.

निलेश सुनील पवार (वय २४, रा. आदर्शनगर, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी २४ ऑगस्ट २०२० रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते.याबाबत पोलीस शिपाई विशाल हनुमंत काळे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश पवार हा सराईत गुन्हेगार आहे. परिसरात त्याची दहशत आणि गुन्हेगारी कुरापती वाढल्याने त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी २४ ऑगस्ट २०२० रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. तडीपरीचा कालावधी संपण्यापूर्वी निलेश पोलिसांची परवानगी न घेता शहरात आला. निलेश शहरात आला असून तो बालाजीनगर झोपडपट्टी येथे असल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांचे एक पथक त्याला पकडण्यासाठी बालाजीनगर झोपडपट्टी येथे गेले. त्यावेळी निलेशने पोलिसांशी झटपटी करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने पोलिसांवर दगडफेक केली. तुम्ही मला विनाकारण पकडता. मी तुम्हाला पाहून घेतो. तुमची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करतो’ असे म्हणून त्याने पोलिसांना धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी निलेशला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.