शिर्डीत नवा वाद!

तृप्ती देसाई यांना ब्राह्मण महासंघाचे खुले आव्हान

0

शिर्डी (अहमदनगर) : काही भाविकांचे तोकडे कपडे विरुद्ध साईमंदिरातील पुजाऱ्यांचे रेशमी सोवळे आणि पंचे, या नव्या वादास आज साईबाबांच्या शिर्डीत प्रारंभ झाला. ब्राह्मण महासंघाचे संस्थापक आनंद दवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे येऊन, साईसंस्थानने याबाबत लावलेल्या विनंती फलकांचे पूजन केले. साईसंस्थानच्या भूमिकेस पाठिंबा दिला.

या भूमिकेला विरोध करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना खुले आव्हान दिले. १० डिसेंबरला त्या हे फलक हटविण्यासाठी शिर्डीत आल्यास त्यांना विरोध करण्याचा इशारा दिला.

साईदर्शनाला येताना सभ्य पोशाख परिधान करून यावे, असे विनंती फलक साईसंस्थानने ठिकठिकाणी लावले. त्यावर आक्षेप घेताना तृप्ती देसाई यांनी, “हा भाविकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. पुजारीदेखील केवळ सोहळे परिधान करून मंदिरात येतात. त्यांचा पोशाख अंगभर नसतो,’ असा युक्तिवाद केला. तसेच, येत्या दहा डिसेंबर रोजी शिर्डीत येऊन हे फलक आपण हटवू, असा इशारा दिला होता.

त्यास येथील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अनिता जगताप यांनी विरोध दर्शवीत संस्थानच्या भूमिकेस जाहीर पाठिंबा दिला. ब्राह्मण महासंघाचे दवे यांनी आज पुजाऱ्यांचे सोवळे आणि पंचे यांचे समर्थन करीत शिवसेनेच्या भूमिकेस पाठिंबा दिला, तसेच “तृप्ती देसाई यांनी आपल्या भूमिकेच्या समर्थनासाठी न्यायालयात जावे; मात्र फलक काढण्यासाठी त्यांना कायदा हातात घेऊ देणार नाही,’ असा इशारादेखील त्यांनी दिला.

वादातून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रकार
वादाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यात धन्यता मानणाऱ्या मंडळींचे शिर्डी हे सर्वाधिक आवडीचे ठिकाण आहे. साईबाबांच्या प्रभावामुळे येथील वादास देश-विदेशात सहज प्रसिद्धी मिळते. त्यामुळे प्रसिद्धी मिळविण्यास उत्सुक असलेले बाहेरचे लोक येथे येऊन वाद उत्पन्न करतात. नव्या वर्षाच्या तोंडावर तोकडे कपडे विरुद्ध पंचे आणि सोवळे हा नवा वाद सुरू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.