अहमदनगर ः ”शिर्डी संस्थानाने पोषाखासंदर्भात लावलेला बोर्ड तातडीने हटविला नाही, तर १० डिसेंबर रोजी लोकशाही मार्गाने आम्ही शिर्डीमध्ये येऊन लावलेला बोर्ड काढू”, असा इशारा भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी संस्थानाला पत्र पाठवून दिला आहे.
पत्रात तृप्ती देसाई म्हणतात की, ”कोणाला काय बोलावे आणि कसे कपडे घावावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अध्यात्मिक ठिकाणी लज्जास्पद वाटेल असे कोणी कपडे घालत नाही. या बोर्ड लावण्यामागे कोणती मानसिकता आणि अर्थकारम लपले आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. तसेच शिर्डीतून आम्हाला धमक्या येत आहेत, आम्हाला काय झाल्यास संस्थान जबाबदार राहील”, असे पत्र देसाई यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, नगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना पाठविले आहे.
शिर्डीत साईबाबांच्या दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भक्तांना आता पारंपरिक म्हणजेच भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे. कारण, शिर्डी संस्थानाने अशी सूचना सर्व भक्तांना केलेली आहे. तशा आशयाचे फलक मंदीर परिसरात लावण्यात आले आहेत.
शिर्डी देवस्थान परिसरात लावलेल्या फलकांवर, ”साई भक्तांना विनंती आहे की, आपण पवित्र स्थळी प्रवेश करत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा परिधाव करावी”, असे लिहिण्यात आलेले आहे. हे फलक हिंदी, मराठी आणि इंग्रजी अक्षरांमध्ये लिहिलेले आहे.