श्रीक्षेत्र देहू आता नगरपंचायत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

0

देहूगाव : जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या देहूगाव ग्रामपंचायतीचे देहू नगरपंचायतमध्ये रुपांतर करण्यात आल्याची अधिसूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढली आहे. मागील अनेक वर्षांच्या मागणीला आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देहू नगरपंचायतीची अधिसूचना आमदार सुनिल शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी संस्थानचे विश्वस्त माणिक मोरे, अजित मोरे, सोसायटीचे अध्यक्ष अभिमन्यू काळोखे, माजी सरपंच मधूकर कंद, कांतीलाल काळोखे, ग्रामपंचायत सदस्या रत्नमाला कारंडे, देहूगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश हागवणे आदी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज यांचे जन्म व कर्मस्थान असलेल्या देहू गावात तुकाराम बिजेच्या निमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच आषाढ वारीकरिता देशाच्या कानाकोपर्‍यातून पालख्या देहूनगरीत येत असतात. तसेच देहूगावाचा विस्तार वाढत असल्याने ग्रामपंचायतीला नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यात अडचणी येत होत्या. देहूगाव तिर्थक्षेत्र विकासासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी येत असल्याने याकरिता देहूगाव ग्रामपंचायतीचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहभाग न करता स्वतंत्र नगरपंचायतमध्ये रुपांतर करा अशी देहूकरांची मागणी होती.

सुमारे 30 हजार लोकसंख्या असलेल्या 2012 सालापासून देहूगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करा अशी मागणी व वारंवार ग्रामपंचायत ठराव करण्यात आले होते. 2016 साली या मागण्यांचा विचार करून तशी सूचना काढण्यात आली होती. त्याचा पाठपुरावा झाल्यानंतर आता देहू नगरपंचायतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यानुसार नगरपंचायतीच्या सिमा निश्चित करण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.