दाजीपूर अभयारण्य विकासाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक वर्षा निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आमदार प्रकाश आबिटकर, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर आदी यावेळी उपस्थित होते.दाजीपूर अभयारण्यात पर्यटन वृद्धीसाठी कोणत्या बाबी प्राधान्याने करणे आवश्यक आहे याबाबत माहिती जाणून घेत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, येथील ऐतिहासिक हत्तीमहाल दुरुस्ती करणे आणि हत्तीसफारी सुरू करणे, राधानगरी येथे नौकाविहाराची व्यवस्था निर्माण करणे तसेच राऊतवाडी धबधबा येथे पर्यटक सुविधा निर्माण करणे या बाबी प्राधान्याने निर्माण करा. तत्पूर्वी तेथे येण्यासाठी चांगले रस्ते आणि निवासव्यवस्था असणे आवश्यक असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून तेथील रिसॉर्टची दुरुस्ती आणि अद्ययावतीकरण करण्यात यावे.
अभयारण्यात फेरीसाठी अंतर्गत रस्ते वन्यजीवांना त्रासदायक ठरणार नाही अशा पद्धतीने विकसित करावेत. पर्यटकांसाठी वनदर्शनासाठी इलेक्ट्रिक बस घेण्यात यावी तसेच स्थानिक युवकांना गाईडचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा. हे करत असताना स्थानिकांना रोजगार मिळेल याकडे कटाक्षाने लक्ष द्या, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
दाजीपूर अभयारण्यात एमटीडीसीच्या माध्यमातून सध्याचे पर्यटक निवास (रिसॉर्ट) अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे तसेच पर्यवरणपूरक पद्धतीने तेथील सुविधांचा विकास करण्यात येत असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.