शरद पवारांबद्दल खूप काही म्हंटलं सांगितलं जातं… त्यांना शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा चालविणारा पुरोगामी राजकारणी म्हणतं… तर, कोण सत्तेसाठी वाट्टेल ते करणारा व्यक्ती म्हणतं… तर, कोणी असं म्हणतं की, महाराष्ट्रातल्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला त्याच्या नावानिशी ओळखणारा सच्चा नेता… तर, कोणी असं म्हणतं की, मोदीलाही महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचा विचार करायचा असेल तर, त्याचा केंद्रबिंदू असणाऱ्या या व्यक्तीला घेऊनच तो परीघ पूर्ण करावा लागेल… तर, कोणी असंही म्हणतं की, या माणसाच्या पोटात एक आणि ओठात एक… तर, कोण म्हणतं कोणत्याही विचारांचा थेट तिरस्कार न करणारा आणि राजकारणात प्रत्येकाचा विचारांचा सन्मान करत आपली राजकीय खेळी करणारा मुत्सद्दी… असे अनेक समज-गैरसमज, संमिश्र भावना असणाऱ्या या माणसाबद्दल जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे.
म्हणून ५ वर्षपूर्वी साताऱ्याच्या छ. शिवाजी कॉलेजमध्ये झापटल्यासारखं वाचत सुटलो. मग, हा माणूस समजायला लागला. शिक्षण, शेती, क्रीडा, साहित्य, राजकारण, संघटना, चळवळी, आंदोलनं अशा विविध क्षेत्रांत महाराष्ट्राची मुस आणि कूस घडविण्यात या माणसाचा वाटा सिंहाचा आहे. असो… शेतकरी दिंडीपासून किल्लारी भूकंपापर्यंत आणि ना. धो. महानोर यांच्यापासून ते लक्ष्मण माने यांच्यापर्यंत लेखकांची कदर करणाऱ्या या माणसाचं काम राजकीय कर्तृत्वाच्या पूर्णत्ववाकडे जाणारा एक प्रवास थक्क करणारा आहे. टिळकांनी म्हंटलेलं की, “आभाळ जरी कोसळलं तरी, त्याच्यावर पाय ठेवून उभा राहीन” असा प्रचंड आत्मविश्वास असणारा हा माणूस आपल्या शारीरिक अडचणींना न जुमानता केंद्राच्या राजकारणात पाय रोवून उभा आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर ज्याप्रमाणे चित्रपट निघाले त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरही निघावे असे प्रतिपादन करणारे शरद पवार… ९६% गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम येणाऱ्या मंगेश म्हसकर नावाच्या गरीब विद्यार्थ्याला आर्थिक मदत करणारे शरद पवार… आणि हिंदू-मुस्लिम दंगलीमध्ये जखमी झालेल्या हजारो लोकांना रक्ताची गरज भासली म्हणून माझ्यापासून रक्तदानाला सुरुवात करा असे म्हणणारे शरद पवार… पवारांच्या कार्यकर्तुत्ववाचे इमले असे उभे राहतात की, माझ्यासारख्या अर्जुनाने शब्दकौतुकांचे कितीही बाण मारले तरी त्यांच्या यशाचा केंद्रबिंदू मला सापडणार नाही.
एकीकडे महाराष्ट्राचा नावलौकिक होत असताना दुसरीकडे त्याच महाराष्ट्रातील ५३% लोकसंख्या ही निरीक्षर आहे म्हणून रयत शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठान बारामती, मातोश्री शारदाबाई पवार शिक्षण संस्था… यांच्या माध्यमातून आणि याच्याही पलीकडे जाऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्थापन करून शिक्षणाची गंगा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न या नेत्यानं केलेला दिसतो. एकेदिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींना म्हणाले होते ”मी उपेक्षित दलित वर्गाचा असल्याने मला घर नाही, नाव नाही आणि जमिन नाही” म्हणून तर मराठवाडा विद्यापीठाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ हे नाव देऊन ह्या दलितांच्या उद्धारकर्त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून दिला. इतका सगळा व्याप केवळ शिक्षणासाठी चाललेला पाहून अमेरिकेतील ‘डेट्राईट’ विद्यापीठासह भारतातील अनेक विद्यापीठांनी ज्या व्यक्तित्वाला डि. लिट ही पदवी बहाल केली त्या व्यक्तित्त्वाचं नाव आहे शरद पवार.
गरीब माणसांना फुकट अन्न देऊन काय उपयोग नाही त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे म्हणून ‘फूड फॉर हंगर’ऐवजी ‘फूड फॉर वर्क’ची योजना सुरु केली. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी गोष्ट पूर्वी कधी घडली नाही भविष्यात घडेल असं अजिबात वाटत नाही ती गोष्ट म्हणजे जळगावच्या रस्त्यावरून लाखोंच्या संख्येने निघालेली शेतकऱ्यांची ‘शेतकरी दिंडी’ होय. महाराष्ट्रात आज जी फळांची रेलचेल चालते ना… त्याचे उदगाते शरद पवार आहेत. म्हणून तर आमच्या महाराष्ट्राची द्राक्षं ही परदेशात ‘महाग्रेप्स’ या नावाने ओळखली जातात. कवयित्री संजीवनी मराठे एका कवितेत फार सुंदर म्हणतात की,
शिक्षक मी, सेवक मी
कलावती मी, शास्त्रज्ञ मी
विश्वाची मी ममता, मजमध्ये संस्कृती वसे
संस्कृती जणू संवर्धे… स्त्री माझं नाव…
मला वाटतं या कवितेचा खरा अर्थ पवारांना कळला असावा कारण राजकारणात प्रत्यक्ष राजकारणात स्त्रीला आरक्षण देऊन अप्रत्यक्षपणे प्रतिगामी विचारांची शृंखला तोडून तिला बाहेर काढली अन सांगितलं की, ”जा तुझ्या विकासाची वाट तुझ्यासाठी मोकळी आहे” आणि मग खऱ्या अर्थाने स्त्री बाहेर पडली. शिक्षण घेऊ लागली… कर्तृत्व गाजवू लागली… पुरुषांच्या खांद्यला खांदा लावून समाजात वावरू लागली. याचं श्रेय जातं शरद पवार यांना!‘माझ्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे; इथला प्रत्येक माणूस सुधारला पाहिजे’ हे यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न पूर्ण केलं ते त्यांच्या या मानसपुत्राने. दलितांच्यासाठी व बहुजनांसाठी मंडळ आयोगाच्या महत्वपूर्ण शिफारसी पवारांनी लागू केल्या. शेतकऱ्यांना कर्ज देणं… त्यांचं कर्ज माफ करणं… त्यांना जोडधंदा करण्यास प्रवृत्त करणं पवारांनी सुरु केलं. पवारांच्याबद्दल एक वाक्य नेहमी वापरलं जातं ‘शरद पवार अभ्यासात कमी आणि खेळण्यात जास्त पटाईत होते’ मला वाटतं पवारांच्या मनात म्हणून तर खेळाबद्दल आणि खेळाडूबद्दल विशेष आत्मियता असावी, यासाठीच तर त्यांनी मावळ प्रांतात ‘श्री शिवछत्रपती क्रीडानगरी’ मोठ्या दिमाखात उभी केली. हल्ली बोलाचीच कडी अन बोलाचाच भात जेवूनिया तृप्त कोण झाला या उक्तीला १००% जागणारे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात असंख्य नेते निर्माण झाले; निसर्ग नियमानुसार प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच की, तो अपवाद म्हणजे शरद पवार आहे.
कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा इ. क्षेत्रात उदात्त आणि उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातील शाहीर केवळ कलेवर जगूच शकत नाही म्हणून त्यासाठी मानधन योजना सुरु करण्यात पुढाकार केला. सचिन ज्या ज्या वेळी शतक करायचा ना त्या त्या वेळी त्याचा वैयक्तिक सत्कार शरद पवार करायचे.
याच्याही पुढे जाऊन पवारांच्या संवेदनशीलतेचा नमुनाच पाहायचा असेल तर लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांना आयुष्याचा शेवटी कैन्सर झाला होता… त्या हयात असेपर्यंत त्यांना आर्थिक मदत करणारे शरद पवार होते.आतापर्यंत सांगितलेल्या पवारांच्या कार्यकर्तुत्वाबद्दल निष्कर्ष काढायचे झाले तर महाराष्ट्राचे किसाननेते, दलितांचे आश्रयदाते, चतुर राजकारणी, चरित्रसंपन्न व्यक्तिमत्त्व असं ज्या माणसाला म्हणता येईल, त्याचं नाव शरद पवार.
– अर्जुन नलवडे (7385611353)