मुंबई ः ”शेवटच्या माणसाच्या हितासाठी तुम्ही लक्ष देता, तेव्हा तुम्हाला समजतं, पुढचा रस्ता कोणता असला पाहिजे ही स्पष्टता येते. मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतो आहे. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथंपर्यंत येता आलं”, असं मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांनी मांडले.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन मुबंईतील वाय. बी. चव्हाण सभागृहात केले होते, तेव्हा ते बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले की, ”माणसाला वय मिळतं. वाढत जातं. जी विचारधारा आपण स्वीकारली. जे सूत्र स्वीकारलं त्या मार्गाने जाण्याचं काम करायचं असतं. सार्वजनिक जीवनात आपण सगळे काम करतो.मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतो आहे. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथंपर्यंत येता आलं.”
”स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी-नेहरू विचारांची पताका घेऊन काम केलं पाहिज हे त्या मातेने स्वीकारलं आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. तिचा दृष्टीकोन महत्वाचा ठरला. अनेकांनी फुले-आंबेडकरांचा उल्लेख केला. सगळ्यांनी आपल्या नेतृत्वातून दृष्टी दिली. आज त्यांच्या नावाचा उल्लेख करून चालणार नाही. त्यांनी दिलेली समाज मानसिकता तयार करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल”, असे आवाहन पवारांनी उपस्थितांनी केली.