पुण्यातील भाजप आमदारांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

0

पुणे : शहरातील भाजपच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या घरावर चोरट्यानी डल्ला मारला आहे. तब्बल १८ लाख रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. या प्रकरणी ममता दीपक मिसाळ यांनी वानवडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिसाळ कुटुंबीय एका बंगल्यात राहते. आमदार मिसाळ यांच्यासह त्यांचे दीर, भाऊजय तसेच मुले या ठिकाणी राहत असून बंगल्यांच्या देखभालीसाठी काही नोकर आहेत.

ममता यांना २८ नोव्हेंबर रोजी लक्षात आले की त्यांच्या तिजोरीवर ठेवलेला हिरे, सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स चोरीस गेला आहे. त्यांनी याबाबत तत्काळ आपले पती दीपक मिसाळ तसेच आमदार मिसाळ यांच्या लक्षात चोरीचा प्रकार आणून दिला.

या प्रकरणी मिसाळ यांनी वानवडी पोलिसांत तक्रार दाखल केली असून गेली पंधरा दिवस या घटनेचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी आमदार मिसाळ यांना विचारले असता त्यांनी घरात चोरी झाल्याचे सांगितले. पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत तपासात फारशी प्रगती झालेली नसल्याचे ही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.