‘ट्रान्सपोर्ट’च्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्याला अटक

0
पिंपरी : घराचे साहित्य दुसऱ्या ठिकाणी पोहच करताना, वेळेवर साहित्य न पोहच करता, जादाचे खंडणी स्वरूपात पैसे मागून, गुंड पाठवून, धमकी देणाऱ्या एकाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

विरेंद्रकुमार रामकिशन पुनिया (25, रा. सध्या ट्रान्सपोर्टनगर, निगडी, मुळगाव जि. चुरु, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, आरोपी विरेंद्रकुमार रामकिशन पुनिया याने व्हीआरएल या नामांकित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नावाचा गैरवापर करून निगडी येथे ‘व्हीआरएल कार्गो इंडिया पॅकर्स’ हि बनावट कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून राजेश नायक यांचे घर सामान पुण्यातून मँगलोर येथे शिफ्ट करायचे होते. त्यासाठी 11 हजार रुपये भाडे ठरले होते.

आरोपीने भाड्याच्या ठरलेल्या रकमेतील आठ हजार घेऊन देखील घर सामान स्वत:कडे ठेवले, तसेच सामान हवे असल्यास 9 हजार रुपये खंडणी स्वरुपात वसूल केली.

फसवणूक झाल्याने राजेश नायक यांच्यावतीने त्यांचे मित्र आशिष गावडे यांनी कर्वेनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा निगडी परिसरातील असल्याने निगडी पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासात निगडीत अशी कोणतीही कंपनी नसल्याचे निष्पन्न झाले.

पुनिया आणि त्याच्या साथीदारांनी अश्या प्रकारे अनेकांना फसवले आहे, खंडणी उकळलेली आहे.पोलीस त्याचा शोध घेत असून अश्या प्रकारे कोणासोबत घटना घडली असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त गुन्हे प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक अनिल लोहार आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.