पिंपरी : आळंदी येथे बेकायदेशीर अमली पदार्थ, गांजा तसेच दारूची विक्री करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून पाच लाख 33 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अंबिका मारुती गरुड (55, रा. आळंदी, ता. खेड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
सामाजिक सुरक्षा विभाग आळंदी परिसरात गस्त घालत असताना एक महिला अवैध गांजा व दारूची विक्री करत आल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी वेषांतर करून व दोन वेगवेगळ्या टीम तयार करून आळंदीतील घुंडरे आळी येथे सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले.
तिच्या जवळून चार लाख तीन हजार किमतीचा पंचवीस किलो 440 ग्रॅम वजनाचा गांजा, एक लाख बारा हजार 900 रुपये रोख रक्कम व साडे तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.