”सहमतीने संबंध ठेवतात अन् नंतर बलात्काराचे…”
छत्तीसगड राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष किरणमयी नायक वादग्रस्त विधान
नवी दिल्ली ः देशात वाढत्या स्त्री अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आणखी एक वाद उफाळून वर आला आहे. ”बहुतांशी मुली स्वतःहून संबंध ठेवतात आणि प्रेमभंग झाल्यानंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात”, असं वादग्रस्त विधान छत्तीसगड राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष किरणमयी नायक यांनी केले.
छत्तीसगडमधील बिलासपूर येथील प्रसार माध्यमांशी त्या बोलत होत्या. नायक पुढे म्हणाल्या की, ”जर एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल, तर मुलींनी पहिल्यांदा पाहायला हवं की, ती व्यक्ती आपल्याला जगण्यासाठी मदत करणार आहे का? पण, असे संबंध तुटतात तेव्हा बऱ्याच घटनांमध्ये महिला पोलीस ठाण्यात धावन घेतात”, असेही मत नायक यांनी मांडले.
”कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसून नका. तुमचं कुटुंब, मित्र आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. हल्ली १८ वर्षीच लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. पुढे काही वर्षांनंतर मुंल होतात तेव्हा दाम्पत्याला सोबत राहणं अवघड होत आहे”, असेही परखड आणि वास्तव मत नायक यांनी मांडले.
नायक म्हणाल्या की, ”सहमतीने संबंध ठेवल्यानंतर नाती तुटण्याच्या घटना बऱ्याच आहेत. लिव्ह-इन-रिलेशनशीप संपते तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल होतात. आम्ही महिला व मुलींना आवाहन करतो की, त्यांनी आधी नातं समजून घ्यावं. जर तुम्ही अशा प्रकारच्या नातेसंबंधामध्ये आहात. तर, त्याचे परिणाम वाईटच होतील”, असे वादग्रस्त विधान नायक यांनी केले.