मुंबई ः ‘‘आपण महाराष्ट्र विधानसभेच्या १८० पानांचं नियमांचं पुस्तक दिलं. ३२० नियम त्यामध्ये आहेत. अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. करोना, करोनाचा बाप, करोनाचा आजोबाही विचार केला तरी सभागृहात घुसू शकणार नाही. एवढी उत्तम व्यवस्था केली त्याबद्दल अभिनंदन, पण याची नियमावली ठरवणार आहात की नाही. कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे”, असे म्हणत अधिवेशनाला सुरुवात होताच भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला.
आज दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होताच विरोधी पक्षांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मराठा आरक्षण आणि अधिवेशमनाचा कालावधी यावरून विरोधी पक्षांनी कामकाज सुरु होण्यापूर्वीच गोंधळ घातला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्ष आणि सरकारने एकत्र येऊन नियमावली तयार करण्याचे आवाहन केले.
विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, ”अनेक प्रश्न आहेत. दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीला परवडणारे नाहीत. आमदारांचे अधिकार आणि त्यांचे प्रश्न सभागृहातच मांडू शकतो. सरकार आणि विरोधी पक्षाने एकत्र येऊन एक निमावली तयार केली जाऊ शकते. इतर राज्यांसारखे ८-१० दिवसांचे अधिवेश घेता येऊ शकतं. पुढील अधिवेशन नियमित होईल, अशी कारवाई केली पाहिजे.”, असेही नाना पटोले यांनी सदस्यांना सांगितले.