पिंपरी : कोरोना लस लवकरच मिळणार असल्याने सर्व पातळ्यांवर लसीकरणाचे नियोजन केले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील हे नियोजन केले असून राष्ट्रीय पातळीवर घोषणा केल्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात देखील आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे.
कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी कोरोना लस निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील सर्व शासकीय व खाजगी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील शासकीय, मनपा आणि खाजगी आस्थापना आरोग्य वैद्यकीय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.
पालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी 73, पी एच एन 8, स्टाफनर्स 21, ए एन एम 136, आशा स्वयंसेविका 148 एवढे मनुष्यबळ उपलब्ध आहे. शहरात कोरोना लसीसाठी 32 शितसाखळी केंद्रे आहेत. त्यात 2 हजार 695 लिटर क्षमतेची जागा उपलब्ध आहे.
कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय प्रशिक्षण सोमवारी (दि. 14) आणि मंगळवारी (दि. 15) झाले. पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी आणि पी एच एन यांचे प्रशिक्षण बुधवारी (दि. 16) आणि गुरुवारी (दि. 17) होणार आहे. पालिकेच्या इतर आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण त्यानंतर होणार आहे.