मुंबई : राजकीय वर्तुळात भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पक्षांतरावरून चांगलेच वाद रंगत आहेत. जनसुराज्य पक्षाचे नेते राजीव आवळे यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपा फोडण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे. त्यात छगन भुजबळ यांनी भाजपातील ७० टक्के आमदार आमचेच आहेत, असा गौप्यस्फोट करून राजकीय वर्तुळात चर्चेचा वेग आणखी वाढविला आहे.
हातकलंगले मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते राजीव आवळे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांना ‘घरवापसी’ची साद घातली आहे.
भाजपाचे ७० टक्के आमदार आमचेच आहेत, असा गौप्यस्फोट करत यासंदर्भात शरद पवार निर्णय घेतील असा इशाराच छगन भुजबळ यांनी दिला. आजी-माजी आमदारांना राष्ट्रवादीत जरी यायचे असले तरी कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही, हे शरद पवार ठरवतील, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.