नवी दिल्ली ः करोना लस आल्यानंतरही मास्क लावणं, हात धुणं आवश्यक आहे, असे मत केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केले आहे. डीडी या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याचा वारंवार पुनरुच्चार केला.
डाॅ. हर्ष वर्धन म्हणाले की, ”लस आल्यानंतरही तोंडाला मास्क लावणं हा सर्वात रामबाण उपाय आहे. लस किती काळापर्यंत आपल्याला सुरक्षा देईल, हे येणाऱ्या काळातच आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे मास्क लावणं सर्वात सोपा मार्ग आहे. आपल्या सुरक्षेसाठी मास्क घालणं आणि हात धुणं गरजेचं आहे. समजा हे लस आली नसती तर हे आपल्या करणं गरजेचं होतं, त्यामुळे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी मास्क लावायला कधीही विसरू नका”, असे मत डाॅ. वर्धन यांनी मांडले.
देशातील लशीच्या चाचण्या वेगवेगळ्या पातळ्यांवर असून भारतातील पहिली लस लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. सहा लसी भारतात तयार होत असून यामध्ये आयसीएमआर व भारत बायोटेक यांची कोव्हॅक्सिन, झायडस कॅडिलाची झायकोव्ह डी, जिनोव्हाची एमआरएनोए लस, सीरमची कोविशिल्ड, हैदराबादची डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज तयार करीत असलेली रशियाची स्पुटनिक ५ या लसींचा समावेश आहे. सहावी लस हैदराबादमधील बायोलॉजिकल ही कंपनी तयार करीत असून ती अमेरिकेतील एमआयटी या संस्थेच्या सहकार्याने विकसित केली जात आहे.