मुंबई ः करोना प्रारंभीच्या तुलनेने रुग्णांचे कमी झालेले प्रमाण आणि करोना प्रतिबंध लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षापासून म्हणजेच १ जानेवारीपासून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात ९ ते १२ वीच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. शाळा सुरू करण्यासाठी महापालिकेसह प्राध्यापक, शिक्षण आणि पालकांनीदेखील सकारात्मकता दर्शविली आहे.
पालघर, ठाणे, मुंबई आणि इतर काही जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये २३ नोव्हेंबरपासूनच ९ ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. राज्यभरातील सुमारे १० लाख विद्यार्थी शाळेत दाखल झालेले आहेत. दुसऱ्या लाटेची भिती पालकांना होती, मात्र, तशी कोणतीही चिन्हं दिसत नसल्याने पुन्हा शाळेत आपल्या पाल्यांना पाठविण्यासाठी पालक तयार झाले आहेत.
पालक शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष अरुंधती चव्हाण यांनी सांगितले की, सहा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण घेऊन मुले कंटाळली आहेत. शाळा सुरु झाली तर, विद्यार्थीही अभ्यासात सजगता दाखवतील.” शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे म्हणाले की, ”राज्यात प्रशासनाचे करोनावर नियंत्रण असून १ जानेवारीपासून ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करायला हरकत नाही”, असे मत त्यांनी मांडले.