पुणे : इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मालकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देउन २० लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतरही कंपनी मालकाला पुन्हा ५० लाखांची मागणी करून रक्कम न दिल्यास ठार मारण्याची धमकी देणा-या सराईताला खंडणी विरोधी पथकाने अटक केले आहे. ही घटना २०१८ ते डिसेंबर २०२० कालावधीत न-हे परिसरात घडली आहे. अविनाश वसंत जाधव (वय २८, रा. दत्तनगर कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून अविनाशची पत्नी काम करीत होती. त्यानंतर तिने काही महिन्यांनी नोकरी सोडली होती. त्यानंतर काही दिवसांनी अविनाशने तक्रारदारास फोन करून तुझे माझ्या बायकोसोबत संबंध आहेत. हे मला माहित असून मी तुझ्या घरी सांगून तुझी बदनामी करतो’ जर तू मला पैसे दिले नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली.
त्यामुळे घाबरून तक्रारदाराने अविनाशला वेळोवेळी मिळून २० लाख दिले. त्यानंतर काही दिवसांपुर्वी अविनाशने पुन्हा तक्रारदाराला फोन करून ५० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी खंडणी विरोेधी पथकाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अविनाशला २ लाख रुपये घेताना ताब्यात घेतले. चौकशीत त्याने इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मालकाकडून आतापर्यंत २० लाख रूपयांची खंडणी घेतल्याची कबुली दिली. अविनाश सराईत गुन्हेगार असून आतापर्यंत त्याच्याविरूद्ध तीन गुन्हे दाखल आहेत.