मुंबई : ”करोनावरील लस येईल तेव्हा येईल, मात्र किमान पुढचे सहा महिने तरी मास्क वापरणं बंधनकारक असेल”, असे महत्वाचे विधान ऑनलाइन जनतेशी संवाद साधताना व्यक्त केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं हे विधान खूप महत्वाचे आहे.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ”लॉकडाउनच्या काळानंतर आता गर्दी वाढू लागल्याने थंडीचे आजार काही प्रमाणात दिसू लागले आहेत. या सर्वांवर औषधं जरी असली तरी प्रतिबंधात्मक इलाज जो कोविडसाठी आहे तोच आहे. मास्क लावा, हात धुवा व सुरक्षित अंतर ठेवा. हे जर आपण कटाक्षाने पाळलं, तर कोविडचं काय इतर कोणतेही साथीचे आजार, आपण जर त्यांच्यापासून अंतर ठेवलं तर तेही आपल्यापासून अंतर ठेवतील. आपल्या देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काल सांगितलं की, करोनावरील लस आली तरी मास्क तुम्हाला लावावा लागणार आहे. म्हणजेच लस आतापर्यंत आलेली नाही परंतु लस येईल तेव्हा येईल, आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहचेल तेव्हा पोहचेल. परंतु ते घेतलं तरी मास्क लावणं हे बंधनकारक माझ्या मते किमान पुढील सहा महिने तरी आहे”, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यक्त केले.
केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्ष वर्धन नुकतेच म्हणाले होते की, ”लस आल्यानंतरही तोंडाला मास्क लावणं हा सर्वात रामबाण उपाय आहे. लस किती काळापर्यंत आपल्याला सुरक्षा देईल, हे येणाऱ्या काळातच आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे मास्क लावणं सर्वात सोपा मार्ग आहे. आपल्या सुरक्षेसाठी मास्क घालणं आणि हात धुणं गरजेचं आहे. समजा हे लस आली नसती तर हे आपल्या करणं गरजेचं होतं, त्यामुळे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी मास्क लावायला कधीही विसरू नका”, असे मत डाॅ. वर्धन यांनी मांडले होते.