पुणे : जीवघेण्या कोरोनाचे थैमान सर्वत्र सुरू आहे. वयस्कर नागरिकांना याचा जास्त धोका असल्याचे सांगितले जात आहे.मात्र, हिंजवडीतील १०५ वर्षांच्या आजींनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना विषाणूवर मात केली आहे. शांताबाई गणपत हुलावळे असे या आजीचे नाव आहे.
हुलावळे यांच्या कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली त्यात आजींना ही कोरोनाची लक्षण असल्याने तपासणी करण्यात आली. त्यांची करोना चाचणी सकारात्मक आल्याने त्यांच्यावर वाकडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. आजींनी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला.पंधरा दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज आजी ठणठणीत बऱ्या आहेत.
डॉक्टर आणि नागरिक आजीचे कौतुक करत आहेत. आजींची रोगप्रतिकार शक्ती चांगली असून आहार देखील आरोग्यदायी असल्याचे आजीच्या कुटुंबीयांनी सांगितले. आजीच्या प्रबळ इच्छाशक्तीची जोरदार चर्चा सध्या हिंजवडी परिसरात आहे.