नवी दिल्ली ः करोना लसीची प्रतिक्षा आता संपुष्टात येणार आहे. पुढील महिन्यात करोना लस भारतीयांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. लसीचा प्रभाव आणि सुरक्षा केंद्रासरकारसाठी महत्वाचा असल्याचं सांगत भारतही लस विकसित करण्यात आघाडीवर आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्ष वर्धन यांनी दिली.
देशातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ स्वदेशी लस विकसित करण्यासाठी काम करत आहेत. ३० कोटी नागरिकांना लस देण्याची क्षमता ६ ते ७ महिन्यांत प्राप्त केली जाईल. जीनोम सीक्वेन्सिंग आणि करोना व्हायरसचे अयासोलेशन करून लस बनवली जात आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.
हे आपलं वैयक्तिक मत…
जानेवारीत भारतातील नागरिकांना कोविड -१९ वरील पहिली लस दिली जाऊ शकते आणि त्यासाठी आपण तयार रहावं. पण हे आपलं वैयक्ति मत आहे, असंही हर्षवर्धन यांनी म्हटलेलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत ज्यांनी लस वापरासाठी अर्ज केला आहे, अशा सर्व लसींचे नियामकद्वारे विश्लेषण करण्यात येईल. कोविड -१९ लस आणि संशोधनाच्या बाबतीत भारत मागे नाही, असंही त्यांनी सांगितलं.