पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात एक अनोखे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदान केल्यानंतर मांसाहारी रक्तदात्यांना भेट म्हणून एक किलो चिकन तर शाकाहारी रक्तदात्यांना पनीर भेेेेट म्हणून देण्यात आले. त्यामुळे पुणे शहरात आज दिवसभर यााा अनोख्या रक्तदान शिबिराची चर्चा होती.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करावे यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. मात्र पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे चर्चा आज दिवसभरात संपूर्ण पुणे शहरात होती.
कोथरूड परिसरात झालेल्या या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना एक किलो चिकन आणि शाकाहारी रक्तदात्यांना अर्धा किलो पनीर देण्यात आले. दुपारपर्यंत या रक्तदान शिबिरात ३०० किलो चिकन आणि ५० किलो पनीरचे वाटप रक्तदात्यांना करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक शंकर केमसे यांनी दिली.