मुंबई : युकेमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार समोर येत असल्याने सर्व देशात खळबळ उडाली आहे. सध्या मात्र राज्य सरकार हाय अलर्टवरून असून तातडीनं संचारबंदी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीनं बैठकही बोलवली आहे. यामध्ये आणखी कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
सीएम ठाकरे आज दुपारी सर्व राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकारी याच्याशी चर्चा करणार आहेत. कोरोना संक्रमणाची स्थिती आणि नव्या कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी कराव्या लगाणाऱ्या उपाययोजना यावर यात चर्चा होणार आहे. राज्यातील महानगरपालिकांमध्ये 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या बैठकीत नवीन उपाययोजनांचाही आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय पुढील महिन्यात भारतात जी लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यात आहे त्यासंदर्भातील पूर्व नियोजनावरही चर्चा होऊ शकते.
ब्रिटनमधील कोरोना स्थिती लक्षात घेता भारत सरकारनं आता ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणं ही 22 डिसेंबर पासून ते 31 डिसेंबर पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. युकेमधून भारतात येणाऱ्या सगळ्या विमानांना 22 डिसेंबर रोजी रात्री 11.59 वा. पासून ते 31 डिसेंबर रोजी रात्री 11.59 वा. पर्यंत स्थगिती राहणार आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचं नवं आणि अतिशय धोकादायक रूप समोर आल्यानंतर भारत सरकारनं हे पाऊल टाकलं आहे.