पुणे : गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाघोली परिसरात अटक केली. त्याच्या ताब्यातून तब्बल तीन लाख 47 हजार रुपये किमतीचा 20 किलो गांजा जप्त केला आहे. अंबु उर्फ अंबादास दशरथ पवार (वय ३५ रा.गायकवाड वस्ती कोलवडी ता.हवेली जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाघोली परिसरात गस्त घालत असताना त्यांना केसनंद रस्त्यावर संशयास्पद अवस्थेतील एक दुचाकीस्वार दिसला. पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले असता तो पळून जाऊ लागला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला थांबवली त्याची झडती घेतली असता दुचाकीवर असलेल्या एका पोत्यामध्ये 20 किलो गांजा असल्याचे आढळले.
त्यानंतर पोलिसांनी लोणीकंद पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तीन लाख 47 हजार रुपये किमतीचा 20 किलो गांजा जप्त केला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.