नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमेवर मागील एक महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांंनी चर्चेसाठी केलेले आवाहन फेटाळले आहे. केंद्र सरकारशी चर्चा काही उपयोग नाही, त्यामुळे आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. केंद्राच्या निमंत्रणावर आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.
कृषीमंत्री तोमर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांकडून करण्यात आलेले आरोपदेखील त्यांनी फेटाळले. आम्ही शेतकऱ्यांशी खुल्या मनाने चर्चा करायला तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजपाच्या अनेक नेत्यांनी विविध ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत करत आहेत.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनादिवशी (२५ डिसेंबर) रोजी पीएम किसान योजनेंतर्गत १८ हजार कोटी रुपये ९ कोटी शेतकरी कुटुंबाना दिले जाणार आहेत. तसेच त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. मोदींचे हे भाषण गावांगावत स्क्रिन लावून ऐकविले जाणार आहे, तशा सूचना भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत, सरकारचा हा प्रयत्न शेतकरी आंदोलनाला प्रतिउत्तर आहे, असेही मानले जात आहे.