नवी दिल्ली ः “अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो”, अशा शुभेच्छा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिल्या आहेत.
केंद्राने शेतकरी संघटनांना पाठविलेल्या पत्राला लेखी प्रतिउत्तर देण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक सुरू आहे. ५०० शेतकरी संघटनांचे नेतृत्व करणारी संयुक्त किसाम मोर्चाच्या बैठकीत पुढील रणनिती ठरवली जात आहे. या मुद्द्यांला घेऊन काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. हे तीन कृषी कायदे रद्द सरकारने रद्द करावेत, अशा मागणीचे २ कोटी सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देणार आहे.
दिल्लीच्या सीमेवर मागील एक महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांंनी चर्चेसाठी केलेले आवाहन फेटाळले आहे. केंद्र सरकारशी चर्चा काही उपयोग नाही, त्यामुळे आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. केंद्राच्या निमंत्रणावर आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.