पुणे : पुणे पोलिसांनी कोर्टातून आरोपींना बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जामीन मिळवून देणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. पुणे शहरात केलेल्या वेगवेगळ्या कारवाई दरम्यान पोलिसांनी ताप महिला सह 37 जणांना अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत पंचवीस हजार पेक्षा अधिक आरोपींना जामीन मिळवून दिल्याचा अंदाज आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन सह इतर ठिकाणी याप्रकरणी सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतः पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आरोपींकडून बनावट आधारकार्ड, वेतन स्लिप, रेशनकार्ड, सातबारा उतारा, बनावट स्टँप, फोटो, वेगवेगळ्या कंपनीचे ओळखपत्र अशी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यातील एका आरोपीने आतापर्यंत कमीत-कमी सातशे ते आठशे गुन्हेगारांना बनावट कागदपत्राच्या आधारे जामीन मिळवून दिला असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना माहिती मिळाली होती, की शहरातील विविध कोर्टात आरोपींना जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी कार्यरत आहे. ही टोळी शिवागीनगर, लष्कर, खडकी, वडगाव मावळसह विविध कोर्टात ही कागदपत्रे सादर करून आरोपींना जामीन मिळवून देतात. त्यानुसार दोन पोलिस निरीक्षक आणि २७ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक, १२ कर्मचारी यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक चारजवळ व इतर ठिकाणी एकाच वेळी मंगळवारी छापा टाकण्यात आला. या सर्व आरोपींना पकडण्यात आले.
गेल्या दोन वर्षापासून तरी हे आरोपी अशा प्रकारचे उद्योग करत आहेत. गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी अशीच एक टोळी पकडली होती. त्यापैकी चार ते पाच आरोपींनी जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा हाच उद्योग सुरू केल्याचे समोर आले आहे. सध्या तरी या चार ते पाच टोळ्या अशा पद्धतीने काम करत असल्याचे समोर आले आहे. या टोळींचा मुख्य सुत्रधार कोण आहे, याचा शोध सुरू आहे. चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा आणि पॉस्को सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा एकत्रित तपास सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या देखरेखेखाली सुरू राहणार आहे.