पोलीस असल्याचे सांगून रुग्णाचा विनयभंग

0

पिंपरी : महानगरपालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षकाने रुग्णाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मी पोलिस आहे असे म्हणत आरोपीने विनयभंग केला असून, याप्रकरणी कंत्राटी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पाठोपाठ काही तासातच राज्यातील दुसरा प्रकार उघडकीस आला आहे.

अनिल मारुती स्वामी (४७, रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी १९ वर्षीय पीडितेच्या वडिलांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे. सोमवारी (२१ डिसेंबर) या दिवशी आरोपी सुरक्षा रक्षकाने मी पोलिस आहे असे पीडित तरुणीला भासविले. त्यानंतर तिला वॉर्ड मधून बाजूला नेत तिचा विनयभंग केला.

पीडितेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी बुधवारी (२३ डिसेंबर) याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. महापालिकेत कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक नेमण्यावरून यापूर्वी अनेकदा वाद झाले आहेत. या कामाचे टेंडर कुणाला मिळावे यासाठीही अनेक नेते आमने सामने आले होते. त्यानंतर मर्जीतील ठेकेदाराला हे कंत्राट मिळवून दिल्याचेही बोलले जाते.

मुंबईत एका तरुणीला उपचाराच्या बहाण्याने वॉर्ड बॉय ने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर काही तासातच पिंपरी चिंचवड मधील महापालिकेच्या हॉस्पिटल मध्ये हा प्रकार घडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. सहायक निरीक्षक गणेश लोंढे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.