ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज भरणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती

पाच तालुक्यातून 15 अर्ज दाखल

0
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. अनेक गावांत बिनविरोध होण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यातच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखांमध्ये तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. याबाबत प्रशासकीय पातळीवर महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पहिल्याच दिवशी अकरापैकी पाच तालुक्‍यांतून केवळ 15 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले. वाई, खंडाळा, पाटण, खटाव, महाबळेश्‍वर व फलटण तालुक्‍यांतून एकही अर्ज दाखल झालेला नाही.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. एकूण 879 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया होत असून, अर्ज दाखल करण्यासाठी अनेक नियम व अटी असल्याने इच्छुकांनी तहसील कार्यालये, तसेच सेतू केंद्रात गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्‍यांतील 15 उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत. सहा तालुक्‍यांतून एकही अर्ज दाखल झालेला नाही.

तालुकानिहाय दाखल झालेले अर्ज पुढीलप्रमाणे आहे. सातारा एक (कोडोली), कऱ्हाड 9, माण एक (कुळकजाई), कोरेगाव दोन, जावळी दोन, तर खटाव, महाबळेश्‍वर, वाई, खंडाळा, पाटण व फलटण येथून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.

दरम्यान उमेदवारांसाठी शुक्रवार (ता. 25) ते रविवार (ता. 27) दरम्यान सुटीदिवशीही ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्याची पावती 30 डिसेंबरपर्यंत जमा करता येणार आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्‍यक त्या कागदपत्रासह विहीत नमुन्यातील उमेदवारी अर्ज दाखल करावे, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्याने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.