मुंबई : मुंबई येथील महाविद्यालयात ‘एम बी बी एस’ कोर्सला सरकारी कोठ्यातून प्रवेश मिळवून देतो, असे सांगून ३१ लाख रुपये घेऊन, फसवणूक करणाऱ्या चौघांच्या टोळीचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. ही टोळी भारतभर कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणात राजीव रामनाथ पांडे (४६, रा. झारखंड) यांनी सायन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माधव यादव (२६), विनय अरुण मिश्रा (२८), सिद्दिकी आझम अकबर (४०) आणि राहुल कुमार सुधीरकुमार सिंग (२५, रा़ नवी मुंबई) यांना अटक केली आहे. यांच्याकडून १४ मोबाईल फोन, विविध कंपनीचे २६ सीमकार्ड, सायन रुग्णालय, के ई एम रुग्णालय, एम बीटी मेडिकल कॉलेजचे बनावट शिक्के व बनावट प्रवेश अर्ज, बनावट ओळखपत्र, बनावट आधार कार्ड, विविध बँकांचे एकूण ३० डेबीट कार्ड, एक कार आणि विद्यार्थ्यांच्या याद्या असा माल हस्तगत करण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन मेडिकल कॉलेज येथे एम बी बी एस कोर्सला सरकारी कोठ्यातून प्रवेश मिळवून देतो, असे आश्वासन दिले. त्यांच्याकडून ३० लाख रुपये रोख व १ लाख ३ हजार ३०० रुपयांचा एसव्हीजीएस, मुंबई यांच्या नावाचा डी डी घेतला. मात्र, पैसे दिल्यानंतरही प्रवेश मिळवून न देता फसवणूक केली आहे.
या तक्रारीवरुन शोध घेताना पोलिसांना मिळालेल्या मोबाईल नंबरवरुन तांत्रिक तपास करुन पोलिसांनी नवी मुंबईतून या चार जणांना पकडले. या टोळीतील इतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.