पारनेर ः शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जानेवारीच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेवटचे उपोषण करणार आहे, असे ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे. दिल्लीत जंतर मंतर किंवा रामलिला मैदानावर जागा मिळाली नाहीतर, स्वतःला अटक करून घेऊ आणि तुरुंगातच आंदोलनाला उपोषणाला सुरूवनात करू, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.
उपोषणासाठी रामलीला मैदानाची मागणी नवी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे. परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. तोपर्यंत एक महिना केंद्र सरकार काय भूमिका घेते, याची आपण वाट पाहणार आहोत. शेतकरी हिताचा काही निर्णय झाला तर ठीक, नाही तर जानेवारीच्या शेवटच्या आठड्यात नवी दिल्ली येथे शेवटचे उपोषण करणार असल्याचा निर्धार हजारे यांनी व्यक्त केला.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना अण्णा हजारे यांनी पत्र पाठवून उपोषणाचा इशारा दिल्यानंतर लगेचच भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे, खासदार डॉ. भागवत कराड यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन त्यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन, “आपल्या मागण्या रास्त आहेत. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव उपोषण करू नये, मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारला वेळ द्यावा”, अशी विनंती केली. मात्र सरकारला आपण दोन वर्षे वेळ दिला. २ वर्षांत शेतकरी हिताच्या मागण्यांसंदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे आपण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे हजारे म्हणाले.