पुणे : दारू पिण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाने दोघांवर भरदिवसा लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
सलीम मेहबूब शेख (वय ४४) याचा काल जाग्यावरच मृत्यू झाला होता. तर तौफिक शेख (वय २७) याचा शुक्रवारी रात्री उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी अनिल कचरावत याला अटक बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम आणि अनिल एकमेकांच्या ओळखीतील आहेत. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास सलीम श्रीजी लॉन्समोरील गल्लीत बसला होता. त्यावेळी तेथे आलेल्या अनिलने त्याच्यासोबत वाद घातला. दररोज सलीम फुकटची दारू पीत असल्याचा आरोप करीत अनिलने त्याच्या डोक्यात इमारत बांधमादरम्यान वापण्यात येणा-या लोखंडी सळईने वार केला. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या सलीमचा जागीच मृत्यू झाला.
त्याचवेळी सलीमला जेवणसाठी डबा घेउन आलेल्या तौफिकला अनिलने पाहिले. त्याचाही राग आल्यामुळे लोखंडी सळई घेउन त्याचा पाठलाग केला. श्रीजी लॉन्समोर अनिलने तौफिकच्या डोक्यात सळईन मारहाण केली. त्यामुळे तौफिक जागेवर खाली कोसळला. परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मात्र, वाद सोडविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यानंतर अनिल हातात सळई घेउन रस्त्याने बिनधास्तपणे फिरत होता. त्यानंतर एका वाहतूक कर्मचा-याने त्याला पाहून ताब्यात घेतले.