मुंबई ः २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनमधून महाराष्ट्रात आलेल्या १६ नागरिकांची करोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यामध्ये मुंबईतील ३ नागरिकांचा समावेश आहे. या करोनाबाधीत रुग्णांची पुढील चाचणीसाठी त्यांचे नमुने पुण्यात पाठविले आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
२५ नोव्हेंबरनंतर मुंबई आणि इतर राज्यातील शहरांमध्ये आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत १ हजार १२२ आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. यामधील १६ जणांचे अहवाल हे करोनाबाधीत असल्याचे आढळले आहे. यामध्ये नागपूरमधील ४, मुंबई ३, ठाणे ३ आणि पुणे २, नांदेड १, अहमदनगहर १, औरंगाबाद १ आणि रायगडमधील १, असा समावेश आहे.
ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रजातीचा शोध घेण्यासाठी वरील करोनाबाधितांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठविले आहेत. वरील १६ नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. यामध्ये ७२ जणांचा शोध घेण्यात यंत्रणेला यश आलेले आहे. या ७० पैकी दोघांना करोनाची बाधा झाल्याचे लक्षात आले आहे.