पुणे : दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई आणि घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने आज आज मंडई परिसरात आणखी आंदोलन केले. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चूल मांडत त्यावर भाकरी थापल्या आणि सरकारचा निषेध नोंदवला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या केंद्र सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय’, या घोषणाबाजीने आजूबाजूचा परिसर दणाणून गेला होता. केंद्र सरकारने गॅसच्या दरात कपात करावी. तसेच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवावेत अशी मागणी या वेळी आंदोलक महिलांकडून करण्यात आली.
जीवनावश्यक वस्तूंचे सातत्याने होणाऱ्या दरवाढीने महिलांचे आर्थिक बजेट कोसळत आहे. केंद्र सरकार फक्त घोषणा करत आहे. प्रत्यक्षात तर काहीच करत नाहीये. आज शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलनं करत आहोत मात्र, जर गॅस दरवाढ कमी नाही झाली तर यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा ही यावेळी आंदोलक महिलांकडून देण्यात आला आहे.